Tuesday, October 8, 2024

मायमराठी: आता एक अभिजात भाषा.

 

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत.भारतातील प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याची संकल्पना केंद्र सरकारने १२ ऑक्टोबर २००४ पासून सुरू केली. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

●      भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे.प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

(A body of ancient literature / texts, which is considered a valuable heritage by generations of speakers)


●      भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.

(High antiquity of its early texts/recorded history over a period of 1500-2000 years )


●      भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत.दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.

(The literary tradition be original and not borrowed from another speech community)


●      प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

(The Classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the Classical language and its later forms of its offshoots)

अशा सर्वसाधारण अटी आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते. त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. तमीळ भाषेला सर्वप्रथम हा दर्जा देण्यात आला.

 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याने केलेला पाठपुरावा सरकारने केलेले प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि राज्य सरकारने १० जानेवारी २०१२ रोजी प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती नेमली.समितीने सात बैठका घेऊन आणि पुरावे जमा करून मराठी भाषेतील १२८ पानी अहवाल ३१ मे २०१३ रोजी  राज्य सरकारकडे सुपूर्द केला.    त्याचा इंग्रजी अनुवाद करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. नंतरच्या काळात काही शंका व प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्याचे निराकरण राज्य सरकारने केले. मराठी भाषा प्राचीन असून अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा साहित्य अकादमीने दिला. पण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित राहिला.

 तब्बल अकरा वर्षांनी तीन ऑक्टोबर 2024  रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर अखेर केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.

मराठी भाषा अभिजात का ?

 महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अहवालात म्हटलं आहे.महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ‘गाथा सप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ असून पुढील काळात लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यासह अनेक समृद्ध ग्रंथपरंपरा मराठी भाषेत आहे. पतंजली, कौटिल्य, टॉलमी, वराहमिहिर, चिनी प्रवासी यूएन त्संग यांच्या लिखाणातील दाखले, ज्येष्ठ संशोधक श्री. व्यं. केतकर यांच्यासह अन्य संशोधकांचे अहवाल, जुन्नरजवळील नाणेघाटात आढळलेला ब्राह्मी लिपीतील सुमारे २२२० वर्षांपूर्वीचा शिलालेख यांसह अनेक पुरावे सादर करण्यात आले.

 भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय फायदे होतात ?

 तीन ऑक्टोबर 2024 पूर्वी देशात फक्त  सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. तमीळ (१२/१०/२००४), संस्कृत (२५/११/२००५), कन्नड (३१/१०/२००८), तेलुगु (३१/१०/२००८), मल्याळम (८/८/२०१३) आणि ओडिया (१/३/२०१४) या भाषांना अभिजात दर्जा होता. आता मराठीबरोबरच बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील पाली व प्राकृत, पश्चिम बंगालमधील बंगाली आणि आसाममधील आसामी भाषेलाही अभिजात दर्जा देण्यात आल्याने ही संख्या ११ वर गेली आहे. अभिजात दर्जा मिळल्याने भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उठते. अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपये विविध माध्यमातून अनुदान स्वरूपात खर्च केले जातात. भाषा भवन, ग्रंथ व साहित्य प्रसार, ग्रंथालये, देशभरातील विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषा प्रसार, अध्यासने, त्या भाषेतील विद्वानांसाठी पुरस्कार आदींसाठी आर्थिक पाठबळ मिळते.एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात? आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने  मराठी भाषा संवर्धनासाठी खालील प्रमाणे फायदे होतील.

●      मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन व साहित्यसंग्रह  तयार करणे.

●      भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.

●      प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.

●      महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणे.

●      मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे.

 Mr.Sheetalkumar Sopanrao Bhong.